Monday, 30 October 2017

भाग- १० काही सुखद क्षण

आत्तापर्यंतच्या ह्या प्रवासात, दगदगीच्या डोंगराला सुखद क्षणांची सोनेरी कडा ही होती, सूर्योदयावेळी दिसते तशीच मोहक. 
 
संपूर्ण ओक्याबोक्या माळरानात आधीची मोजून ४ झाडे होती, पण तीही बहुतांशी deciduous trees प्रकारातली (पानगळ होणारी)  त्यामुळे मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात उभे राहून 
काम करवून घेणे भाग होते. प्रत्यक्ष जरी काम करायचे नसले तरी, आपल्या कडील अकुशल कामगारांकडून कामे करून घेणाऱ्या प्रत्येकाला माहित आहे की, अशा कामांत स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. दुपारच्या प्रहरी तर जीवाची काहिली होत असे. मग अशा वेळी त्या मोजक्याच झाडांपैकी एका झाडाखाली बसून, घरून अगदीच फडक्यात बांधून वगैरे नाही तरीही डब्ब्यात भरून आणलेली पोळी -भाजी, वरण-भात खाताना स्वर्ग सुख मिळत असे.  कधी मस्त, मास्याचा रस्सा आणि भात किंवा भाकरी, अहाहा !! त्यांनतर कसलाही किंतु परंतु न बाळगता तिथेच पथारी पसरून घेतलेली वाम कुक्षी !  

शहरात राहणारे दोन engineers, कधी काळी आपला शनिवार रविवार असा घालवणार आहेत हे जर ह्या पूर्वी कोणी सांगितले असते तर विश्वास बसला नसता. कधी कधी फार साध्या गोष्टी अवर्णनीय असा आनंद देऊन जातात. site वरच साजरा केलेला आई -पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस, पहिला पाऊस, मृदगंध, दगड- मातीच्या ढिगाऱ्यात केलेली मस्ती; weekends ला होणाऱ्या mall मधल्या भटकंती पेक्षा खूप खरी वाटत होती. 




क्रमशः 

भाग - ९ Canvas वरील पहिला स्ट्रोक

घर बांधण्याबरोबरच, माळरानाचा कोरा canvas  आम्हाला सतत खुणावत होता. 


कधी कधी कामाचा काहीच अनुभव नसणे फायदेशीर असते, ह्याची अनुभूति ह्या canvas  वर 'निसर्ग चित्र' चितारताना आली.    
जेंव्हा तुमची पाटी पूर्ण कोरी असते तेंव्हा तुमचे मन नविन गोष्टी शिकायला आणि प्रत्यक्षात उतरवायला उत्सुक असते. (कारण,तेंव्हा अपयशी अनुभवांमुळे अतिरिक्त चिंता करण्याची सवय मनाला जडलेली नसते. ) . 

Monocropping, ज्या मध्ये एकाच प्रकारचे पीक घेतले जाते त्या पद्धतीची शेती करायची न्हवती. कारण त्यासाठी शेतीचे सखोल ज्ञान, अनुभव आणि वेळ ह्या गोष्टी पाहिजे आणि दुसरे असे कि आता पर्यंत permaculture, पाळेकरांचे zero -budget natural farming आणि फुकुओका बाबाचे natural farming ह्या मधून जी माहिती मिळाली होती, त्या नुसार  Multistory agroforestry आमच्या साठी योग्य असल्याची खात्री पटली होती. वेगवेगळ्या नैसर्गिक कारणांमुळे (पिकांवरील कीड, बेभरवशाचा पाऊस, तापमान वाढ) होणारे शेतीचे नुकसान ह्या पद्धतीमुळे नियंत्रणात राहते. जैवविविधता जतन केली तर आणि तरच निसर्ग प्रसन्न रहातो आणि अर्थातच आपणही शाश्वत आनंद उपभोगू शकतो. अजूनही एक विचार मनात रुंजी घालत होता तो म्हणजे, आपल्या बालपणी जी विविध प्रकारची फुले-फळे आपल्याला पाहायला मिळाली, त्या सर्वांचे संगोपन आपण ह्या माळरानी करावे.    

ठरले तर मग, विंड ब्रेकिंग साठी  'कदम्ब' , 'Mangium- ऑस्ट्रेलियन साग' , 'बहावा' ह्या झाडांची निवड केली.  'गुलमोहोर','नीलमोहोर' , 'कडुनिंब', 'करंज', 'कांचन','बेलं', 'रेन-ट्री '  सीता-अशोक, नारळ  अशी मोठी झाडे परिघावरती लावली. 
 
 



आंबा, पेरू, फणस (jack fruit), काजू, चिकू(sapota),जांभूळ (jamun), जांब (water-apple), सीताफळ, रामफळ, अननस, डाळिंब,आवळा, शेवगा ही फळ झाडे आणि जाई, जुई , मोगरा, चाफा, बकुळ, पारिजातक, झेंडू, अनंत , तगर, मधू-मालती, चमेली, शेवंती, गुलाब, जासवंद , कृष्ण कमल ही फुल झाडे त्यांच्या नवीन घरी विराजमान झाली.  

 





क्रमशः

भाग - ८ घराची गोष्ट


Landscaping बरोबरच २ खोल्यांचे घरही बांधायचे ठरले. वीकएंड मध्येच मिळणारा वेळ, बजेट,उपलब्ध साधन सामुग्री आणि कुशल/अकुशल मनुष्यबळ ह्याच्या चौकटीत बसवता येईल अशा पर्यायांची पुन्हा एकदा चाचपणी झाली. 

आधी स्वतःसाठी एका खोलीत स्वयंपाक घर आणि दुसऱ्या खोलीत राहण्याची सोय अशा विचारांवरून ते पुढे जर कधी काळी आपण Homestay चा पर्याय निवडलाच तर मग बरे पडेल म्हणून मग वेगवेगळ्या दोन खोल्या आणि प्रत्येक खोलीत एक छोटे kitchen platform ज्या मध्ये एक kitchen-sink बसेल, एक छोटा 'travelling gas stove' राहील, अशा विचारां पर्यंत आमची गाडी पोहोचली.
आणि प्रत्यक्षात आम्ही पप्पांच्या मार्गदर्शनाखाली आणि supervision खाली २ रूम्स (with attached bathroom in each, kitchen platform वगळून) काढल्या. दर वेळी आम्हाला कळून येत होते कि, जेंव्हा प्रत्यक्ष site वर न राहता, वीकेंड्सलाच फक्त कामावर देखरेख ठेवता येत असेल, तेंव्हा कित्येक गोष्टी आपण ठरवतो त्या प्रमाणे जशाच्या तशा घडत नाहीत.

तर असो; मना जोगते घडत नसल्या मुळे होणारी चिडचिड,  आठवडा भर ऑफिसचे आणि घरातले routine काम ,वीकेंडची दगदग, प्रत्येक छोट्यातल्या छोटया गोष्टींवर (floor टाईल्स, बाथरूम ची लांबी-रुंदी , बाथरूम फ्लोररिंग अँड टाईल्स, पडवीतल्या लाद्या,)ह्यावर होणारी चर्चा,मग त्याला कधी कधी मिळालेले वादाचे स्वरूप ; त्यातून final झालेल्या गोष्टींची खरेदी, ह्या सगळ्यातून आमचे छोटे माळरानावरचे घर साकारत होते.






घर बांधून झाल्यावर आम्हाला कळले कि आम्ही त्यात काही मोठ्या चुकाही केल्या आहेत, पण त्यातूनच  आम्ही मार्ग काढत गेलो . फ्लोअरिंग आणि टाईल्स साठी केलेल्या खोपोली-खानाव वाऱ्या, मातीच्या कौलांसाठी  केलेला धरमतर चा प्रवास, खोलीतील छोट्या कपाटांसाठी आणि बेड साठी केलेली ओशिवरा मार्केट ची सफारी या आणि अशा खूप गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळाल्या. काही चुकून झालेल्या गोष्टींचाही आम्हाला पुढे फायदा झाला (किंबहुना तो तसा कसा करून घ्यावा ते शिकणे भाग पडले.)

क्रमशः

Sunday, 29 October 2017

भाग - ७ खड्ड्यांची किमया

आता ह्या माळरानी बाग फुलवण्याचा आम्ही चंग बांधला. 
पप्पांच्या ओळखीच्या BSC Agri. consultant ला मदतीला घेतले. नेट वरून तो पर्यंत महाराष्ट्रातील स्थानिक (indigenous) वनस्पती, झाडे ह्या बद्दल भरपूर माहिती मिळवली. 
Mono-cropping आणि Chemically loaded farming  करायचे नाही हे आधी पासूनच ठरवले होते.  
Multi Story  agroforestry वर भर देण्याचे निश्चित केले. 

सर्वात आधी तारेचे (Pole and barbed wire fence) कुंपण घालून घेतले. खरे तर झुडुपांचे (मेंदी, निवडुंग इ. ) नैसर्गिक कुंपण घालायचे होते, पण कधी कधी budget च्या आणि वेळेच्या बंधनात राहून आपले काम पूर्णत्वास न्यायचे  असेल तर काही अप्रिय गोष्टी करणे भाग पडते . 
आपल्या मुख्य ध्येया पर्यंत एक मार्ग जातो, त्या मार्गावरील  प्रत्येक छोट्या छोट्या  गोष्टी आपण ठरविल्या तशाच दर वेळी होतील असे नाही, तरी त्या कडे दुर्लक्ष करता आले पाहिजे; Pole and barbed wire fence घालून घेताना हे प्रथमतः उमगले. नैसर्गिक कुंपण घालणे हे आमच्या तत्वाला (शक्य तितके नैसर्गिक आणि external resources चा कमीत कमी वापर ) शोभेल असेच होते. पण ते जर पूर्ण जागेला घातले असते तर, त्या झुडुपांची वाढ होई पर्यंत त्यातून गुरे-ढोरे, भटके कुत्रे, शेळया आत शिरून लावलेल्या झाडांचे नुकसानच अधिक झाले असते. म्हणून maintenance, money and manpower ह्याचे गणित जुळवून  Pole and barbed wire fencing  घालण्याचे आम्ही ठरवले. पुढे अनुभवाने, नुसत्या barbed wire fencing ऐवजी chain linked fencing घालणे गरजेचे आहे हे उमजले आणि दुसऱ्या वर्षी chain linked fencing घालून घेतले. काही गोष्टी अनुभवातूनच शिकता येतात. 



आम्ही landscaping चा एक जुजबी आराखडा तयार केला.  
मला अजूनही तो दिवस लख्ख आठवतोय, झाडे लावण्यासाठी मजूर आणि आपण मिळून खड्डे खणू म्हणून 
आम्ही एक खड्डा खणायला सुरुवात केली, पण आमची जमीन इतकी मुरमाड आहे आणि त्यात शारीरिक श्रमाची वानवा त्या मुळे जवळ जवळ ३ तास  झाले आम्ही दोघे एक खड्डा खणत होतो. बरे, तो ही केवळ निम्माच खणून झाला. मग पुन्हा एकदा काळ-काम-वेगाचे गणित करून बाकीचे सगळे खड्डे JCP लावून खणून घ्यायचे ठरले. त्यातही पुढे गम्मत वाढून ठेवली होती. पुढील weekend पर्यंत सगळे खड्डे व्यवस्थित  खणून झाले असतील म्हणून अति उत्सहाने आम्ही जागेवर  भेट द्यायला आलो  आणि बघतो तर काय! काही काही खड्डे २*२ चे न होता , ५*५ चे झाले होते. 
ते 'आ वासून ' बघणारे खड्डे जणू आम्हाला विचारात होते  "आता तुम्हाला खाऊ की  गिळू ?" 
त्याचे झाले असे, जमिनीतले काही काही दगड इतके मोठे होते कि खड्डेखणताना,  ते दगड बाहेर काढल्यामुळे मूळ खड्ड्यांचा आकारच वाढला होता. आता ते खड्डे परत मजुरांकरवी भरून घेतल्याशिवाय पर्याय न्हवता.  
मग पुढील ३ दिवस तेथेच राहून खड्डे मना जोगते करून घेतले. 




क्रमशः

भाग -६ दगड धोंडे आणि blank canvas

तर नावावरून सुज्ञ वाचकांना कळेलच असेल कि आज मी माळरानाची गोष्ट सांगणार आहे. 
आमचे 'Canvas' हे असे केवळ दगड धोंड्यानी भरलेले असेल ह्याची खरेतर आम्हालाही कल्पना न्हवती. 
माळरान पावसाळ्यात जरी हिरवे गार दिसले, तरी ती गवत आणि छोट्या रान वनस्पतींची करामात होती. 
फार कमी आणि निकृष्टय दर्जाच्या मातीतही  (top-soil) निसर्ग आपली किमया दाखवत असतो.
 पण शेती करायची तर एक विशिष्ट दर्जाची माती लागते, अर्थात त्या साठी आधी माती असणेही गरजेचे असते. 
आमच्या बाबतीत मात्र ' पृथ्वी दगड , तारे दगड ' आणि दगडंच दगंड चोहीकडे ह्याचा वारंवार प्रत्यय येत होता. 



त्यात भरीस भर म्हणून त्या टेकडीचा उतार (slope) खूपच तीव्र होता. पण ह्या सगळ्यात दिलासा देणारी एक गोष्ट होती, ती म्हणजे आमची जमीन ही दोन भागांत विभागली होती आणि खालचा भाग एक छोटे भात -खाचर होते. (पण अगदीच काही नसण्या पेक्षा हे ही नसे थोडके )  




तीव्र उतारामुळे  फार काही करणे शक्य होणारे न्हवते, म्हणून मग आम्ही तो उतार दोन टप्प्यात विभागून एक छान पाय -वाट  काढली.  




टप्या टप्यात उतार विभागल्यामुळे झाडे लावणे ही सोप्पे जाणार होते आणि आमच्या डोळ्यापुढे वृक्षांनी वेढलेली पाय-वाट साकारत होती. 



क्रमशः

Wednesday, 25 October 2017

भाग -५ श्री गणेशा

मला असा कुठलाही अमुक एक खास दिवस आठवत नाही की मी म्हणून शकेन 'त्या दिवशी आम्ही आमच्या कामाचा श्री गणेशा केला'.  एक मात्र होते की, शहरा पासून थोडे दूर पण तरीही वीकएंड ला ये जा करता येईल असे ठिकाण आत्ता पर्यंत फायनल झाले होते. 

त्याचे झाले असे की नोकरी लागून वर्षभरात (म्हणजे आज पासून १४ वर्षे आधी )त्याने एक पडीक माळरान विकत घेतले होते. ओसाड माळरानाच् ते, त्यामुळे  तेंव्हा खूप स्वस्त मिळाले होते. पुढे कधीकाळी ते विकता येईल म्हणून पप्पानी त्याला त्यात 'इन्व्हेस्ट' करायला सांगितले होते.  
शेतीचा काहीच गंध नसल्या मुळे (थोडक्यात थोड्या अडाणीपणा मुळे , थोड्या जिद्दीने आणि खूपशा स्वप्नाळू वृत्तीमुळे ) आम्हाला वाटले की आपण ह्या माळरानात शेती करू आणि घर बांधू .

 माळरानाचे आज नंदनवन नक्कीच झालय पण शेती किती आणि कशाची करता आली ते पुढे कळेलच !

तो जरी मुळचा शेतकरी कुटुंबातला (म्हणजे त्याचे आजोबा शेतकरी होते) तरी त्याचे लहानपण बिगर शेतीतलेच आणि माझा तर शेतीशी काडीचाही संबंध न्हवता. कोबी, फ्लॉवर झाडावर लागत नाही , दुधी भोपळ्याची वेल असते हे ही जिथे माहित असण्याची शक्यता शून्य तिथे आम्ही शेती करायला निघालो होतो.  तर असो, म्हणतात ना 'जेथे google तेथे ज्ञानाचा पाझर' . 
Google आणि youtube वरील ज्ञान भांडारावर नितांत श्रद्धा ठेवून आम्ही आमचे शेतकी शिक्षण सुरु केले . 

वर्षभर geekgardener.in, www.urbanleaves.org , दीपक सचदेंचे (netueco ) youtube वरील विडिओ अशा साईट्स वरून आणि 'Organic Terrace Gardening' सारख्या FB ग्रुप वरून खूप काही नविन शिकायला  मिळत होते. फार्मिंग मध्येही प्रकार असतात, कंपोस्टिंग वेग वगेळ्या पद्धतीने करता येते. कोणी 'netueco farming' करते, तर कोणी permaculture, कोणी 'natural फार्मिंग ' तर कोणी 'सेंद्रिय शेती'.
 ह्या आणि अशा कितीतरी गोष्टींचा खजिना असलेली अलिबाबाची गुहा आमच्या समोर उघडली गेली होती.  
काय शिकावे आणि किती शिकावे ! 
मुळात सुरुवात कुठून आणि कशी करावी. 
एक मात्र नक्की होते की आम्ही विषारी रासायनिक (harmful chemical ) फार्मिंग करणार न्हवतो. 

मग शेवटी तो दिवस आलाच जेंव्हा आम्ही आमच्या माळरानाला भेट देऊन थोडे  प्राथमिक स्वरूपातील 'landscaping'  करून घेतले. 





क्रमशः

Saturday, 14 October 2017

भाग -४ Exploring Options - 'माझ्या मामाचे गाव'.

'पावस''मधील मंत्र मुग्ध करणाऱ्या मुक्कामा नंतर आम्ही आमच्या शोध मोहिमेतील पहिल्या वाहिल्या स्थळी पोहोचलो. ते ठिकाण म्हणजे गुहागर तालुक्यातील, मुंढर येथील 'माझ्या मामाचे गाव'. 




१२. ५ एकरांवर वसलेले हे साळवी कुटुंबियांचे कृषी पर्यंटन केंद्र. साळवी काका, काकू आणि त्यांची २ मुले संकेत आणि समीर मिळून हे  निसर्ग पर्यटन केंद्र चालवितात. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार, संकेत साळवींच्या मामा चे ते गाव होते. खऱ्या अर्थाने मामाचे गाव म्हणून त्यांनी त्यांच्या कृषी पर्यंटन केंद्राचे नावाचं मुळी ठेवलय 'माझ्या मामाचे गाव. 

ती जमीन कित्येक वर्षे पडिकच होती. साळवी काकांच्या VRS मधून आलेल्या पैशांनी त्यांनी ती जमीन विकत घेतली. सुरुवातीची काही वर्षे त्यांचा मोठा मुलगा समीर, मुंबईतून मुंढरला ये जा करून जमिनीची मशागत, वृक्षांची लागवड  ह्या गोष्टी जातीने करून घेत होता. काका काकूही तेंव्हा जाऊन येऊन होते. पुढे समीर मग मुंढरलाच स्थायिक झाला. काका, काकू तो पर्यंत संकेतच्या शिक्षणासाठी मुंबईत, लालबागला राहत होते. संकेतचे शिक्षण पूर्ण झाले आणि मग काय, त्यांचा जीव थोडीच मुंबईत रमणार होता ? त्यांनी लगेच मुंढरला आपला मुक्काम हलविला तो आजतागायत.सेकंड इंनिंग मुळे हाती आलेला मोकळा वेळ आणि निसर्गाची अतोनात आवड,  त्या पडीक जमिनीचे नंदनवन होण्यास फार काळ लागला नाही 

येथील भाजीपाल्याची लागवड, वृक्षांची देखरेख आणि अथितीचें स्वागत काका काकू जातीने करतात आणि  पर्यटन स्थळाच्या प्रसिद्धीचे काम साळवी बंधू सांभाळतात. आम्ही भेट दिली तेंव्हा १२ एकर मधील २. ५ एकर चा परिसर, पर्यंटन केंद्र म्हणून डेव्हलप केलेला होता. जांभ्या दगडातील सुंदर कोकणी पद्धतीची कौलारू cottages आणि  त्या cottages कडे जाणारी तितकीच सुबक नागमोडी जांभ्या दगडाची पायवाट, आजूबाजूला असणारी नारळी-पोफळीची ची झाडे, आम्ही जरी इतका प्रवास करून आलो होतो तरी त्या सौंदर्याने आमचा क्षीण पार नाहीसा झाला .  




आम्ही दोघांनी काका आणि काकूंना भरपूर प्रश्न विचारले आणि त्यांनीही अतिशय आपुलकीने सगळ्याची माहिती पुरवली.  काकांच्या बोलण्यातून शहरातून इथे गावी स्थायिक झाल्यावर मिळणार आनंद आणि मातीशी पुन्हा नाळ जुळून आल्यामुळे मिळणारे मानसिक समाधान डोकावत होते.

सूर्य मावळतीला लागला, तसे काकूंनी दिलेला वाफाळणारा चहा आणि काकांनी दिलेली सोनटक्कयाची आणि गुलाबाची फुले घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. बरोबर अर्थातच खूप सारा उत्साह आणि नवी आशा घेऊनच. 

क्रमशः

Friday, 13 October 2017

भाग -३ Exploring options

हा अतिशय रोमांचक असा टप्पा होता. अगदी पार Caravan Camping ते Living Off grid चे options  आम्ही (आम्ही म्हणण्या पेक्षा मीच, कारण मलाच ह्या सगळ्यात दांडगा उत्साह आणि जुजबी माहिती होती) धुंडाळत होतो.
अनेक इंटरनेट वेबसाइट्स ज्या Travel and work around the world ह्या विषयाशी निगडीत होत्या त्या सर्वांची मी सदस्य झाले. त्या बरोबरच Home Schooling, Un-schooling, Alternate Schooling ह्या विषयां संदर्भात माहिती देणारे FB groups, blogs, website ह्या वर मी दिवसें दिवस पडीक राहू लागले.
आता कोणाला वाटेल, मुंबईच्या जवळ स्थालांतरा साठी योग्य खेडे (गाव) शोधायचे तर हे काय भलतेच !
पण आपले मन तशा पद्धतीने काम करीत नाही ना , ते अनेक वाटा शोधत असते आणि ह्या शोधातच कधी अचूक वाट सापडते.
वरील online शोधा बरोबरच आम्ही offline शोधही सुरु केला. मुंबईच्या असा पास राहणाऱ्या ज्या ज्या व्यक्तींनी निसर्गा सोबत सहजीवन सुरु केले होते किंवा निसर्गाशी अधिक निगडित अशा स्वरूपाचे जीवन स्वीकारले आहे, अशा मंडळींची प्रत्यक्ष भेट मोहीम सुरू करायचे ठरले.
कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो, तसे आम्ही निसर्ग सुंदर अशा अध्यात्मिक ठिकाणाची भेट देऊन करण्याचे ठरवले. ते ठिकाण अर्थातच आमच्या लाडक्या कोकणातले 'पावस', हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव . 
तो संपूर्ण प्रवास आम्ही शक्य तितका कोकण किनारपट्टी ला लागून केला. कार ने NH-4, मग दाभोळ आणि जयगड ला बोटीने आणि नंतर NH4 and आरे -वारे रोड आणि शेवटी पुन्हा NH4.
गुहागर, वेळणेश्वर, हेदवी आणि गणपती पुळे मंदिर असे मजल दर मजल करीत आम्ही 'पावस' ला आलो. अहाहा !!! तो प्रवासाचं इतका अप्रतिम होता की बस्स.
 'पावस' ला स्वामी स्वरूपानंद समाधी मठ आहे. मी धर्मा पेक्षा अध्यात्म मानते. इथे कुठलेही अवडंबर नाही, इतर मंदिरात असते तशी गर्दी, नुसतीच चेंगरा चेंगरी नाही. तुम्ही शांत पणे मंदिरा खालील समाधी मंदिरात ध्यानस्त बसू शकता. इथली सायंकाळाची आरती म्हणजे एक पर्वणीच. इथल्या सुंदर निसर्गाने आणि पवित्र वातावरणाने मन खूप प्रसन्न होते. अशा सुंदर मनाने आम्ही दुसऱ्या दिवशी पावस सोडले आणि आमच्या पहिल्या वाहिल्या रोल मॉडेल कुटुंबाला भेट दिली.   

क्रमशः 

Thursday, 12 October 2017

भाग -२ Dilemma and Contemplation

भाग -२
पैसा तर महत्वाचा आहेच आणि कोणी म्हणत असेल की तसे काही नाही, पैश्याशिवाय जगात बरेच काही साध्य होवू शकते,  तर ती व्यक्ती गडगंज श्रीमंत तरी असेल (जमीन ,संपत्ती ) किंवा तिचे समाजातील स्थान(पिढीजात ) उच्च मध्यम वर्गीयांच्या श्रेणीतील तरी असेल, ह्या दोन प्रकारच्या लोकांनाच असे बोलण्याची मुभा आहे.
बाकी ज्यांच्या कडे असे काहीच नाही, ज्यांचा जन्म,शिक्षण आणि नोकरी सगळेच मुंबईतील आणि ज्यांना स्वतःचे कष्ट हीच शिदोरी त्यांना पैसा मुंबईत किती गरजेचा आहे हे चांगलेच माहित असते.
 निदान स्वतःचे हक्काचे, चांगल्या सोसायटी मधले घर ,एक बजेट ४व्हिलर घेण्या इतपत (किंवा हवे तेंव्हा ओला/उबेर ने प्रवास करण्या इतपत) तरी श्रीमंत(?!!) ह्या मुंबईत असलेच पाहिजे. 
नाहीतर मग आहेच, घामेजलेल्या जीव गुदमरणाऱ्या (अणि क्वचित प्रसंगी प्राणावर बेतणाऱ्या ) गर्दीतून केलेला बस किंवा ट्रेनचा प्रवास. सकाळी सकाळी वैऱ्या वरही येऊ नये अशी 'चाळीतल्या common toilet' ची  सफर आणि प्रत्येक गोष्टीचे गगनाला भिडलेले दर! निम्न मध्यम वर्गीय होवून रहाणे मुंबईत शाप आहे.

तर एका मुंबईकराची हीच व्यथा आहे की मुंबईत सुखाने जगण्यासाठी उर फुटे पर्यंत काम करायचे, घडयाळाच्या काट्यावर नाचायचे. त्यातूनच मग कधी कधी आजार पण आले कि आपण कसे निसर्गा पासून दूर झालोय, ऑफिस parties किंवा family गेट together च्या नावा खाली आपण कसे वीकेंड्स ना आपल्या शरीरावर जंक फूड लादतोय आणि त्यातून भरीस भर म्हणून ,विषारी chemicals ची फवारणी केलेला भाजी पाला व फळे खाऊन शरीरावर दूरगामी परिणाम  झालेली बरीचमाणसे आपल्या आजू बाजूला कशी वावरत आहेत. हे आणि अशांसारखे असंख्य विचार मनात गर्दी करायचे.
 Personal आणि professional  life ह्यांचा सुवर्ण मध्य साधता आला तर?!. सिमेंट काँक्रीटच्या जंगला पासून दूर , निसर्गाच्या सानिध्ध्यात रोज राहता आले तर ?!
आता मुंबई बाहेर जाऊन राहणे हा एकच पर्याय दिसत होता. 

गोव्याला शिफ्ट होऊया का किंवा लाडक्या कोकणात ? मस्त समुद्र किनारी छोटेसे घर बंधू आणि राहू.
अहाहा , काय सुंदर कल्पना . पण मग पोटापाण्याचे काय, नोकरीला पूर्ण राम राम ठोकायचा का? गावी मुंबई सारख्या सोयी -सुविधा थोडीच उपलब्ध होणार आहेत. ?
 मुलीच्या शिक्षणाचे काय, तिचे इतर छंद वर्ग, आणि आता तिला मुंबईतील वातावरणात राहणाऱ्या मित्र मैत्रिणींची सवय झाली आहे. गावातील शाळेत ती जुळवून घेऊ शकेल का?
 दोघांचे आई-वडीलही  इकडे आणि आपण कोकणात किंवा गोव्याला कसे राहून चालेल. इथे निदान ते आपल्या कडे आणि आपण त्याच्या कडे जेव्हा हवे तेंव्हा जाऊ येऊ शकतो. एवढ्या लांब राहायला गेल्यावर ते शक्य होणार नाही. 
मग मुंबई जवळच्या खेडेगावात राहता येते का पाहू ह्या वर दोघांचे शिक्का मोर्तब झाले.
 इकडे फेसबुक आणि Google च्या माध्यमातून मला "Homeschooling" ह्या मुलांना शिकवण्याचा नव्या पर्यायाची तोंड ओळख झाली. घरी राहून , निसर्गाच्या सान्निध्यात आपण आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करून घेऊ शकतो ही कल्पनाच मनाला मोहून टाकत होती.
मग सुरु झाला पर्याय शोधण्याचा प्रवास.

क्रमशः

Tuesday, 10 October 2017

भाग -१ Awakening


"छे आता बस्स ,
रोज ऑफिस मधले  late sitting, रोजचाच traffic Jam, तीच ती गर्दी,  रोज घरी पोहोचायला होणारा उशीर, आणि घरी पोहचे पर्यन्त वाट बघून झोपलेले आमचे गोड पिल्लू.
काहीतरी केले पाहिजे ह्यातून बाहेर पडायला, It is really a high time now!! "
शनिवार, रविवार काही निवांत क्षण मिळाले कि आम्हा दोघां मध्ये असा संवाद हमखास व्हायचा.

मावशींच्या मदतीने घरातले काम,  मुलीचा  अभ्यास , तिचे शाळा, डान्स , खेळ, अभ्यास ह्याचे वेळापत्रक सांभाळताना होणारी तारेवरची कसरत आणि ह्यातून वेळ काढून कधी कामाच्या वेळेनुसार कधी स्वतःच्या सवडी प्रमाणे केलेले ऑफिसचे काम, हुश्श्श !! 
ह्या सगळ्याचा स्ट्रेस आणि मुंबईचे प्रदूषण, मग प्रकृती च्या ही सतत चालणाऱ्या कुरबुरी.  

वेळी - अवेळी  जेवण्यामुळे हळूहळू त्याचाही दोंदिल तनु होवू लागला होता. त्यालाही कुटुंबा सोबत जास्त वेळ घालवता येत न्हवता. शनिवार, आठवडा भराची तुंबलेली कामे करण्यात जाई आणि रविवार दुपार, माशाचे कालवण आणि भात ओरपून छानशी वामकुक्षी घेण्यात. मग उजाडे रविवारची संध्याकाळ, आता दुसरी कडे कुठे जाणार, म्हणून उगीचच  मॉल मध्ये पाय आणि अधन - मधनं खिसा मोकळा करण्यात जाई. 

कुठेतरी काहीतरी चुकतंय, काही हरवतंय, आपल्या गरजा भागवण्यासाठी नोकरी करता करता, नोकरी साठी आपण, असे काहीतरी होऊन बसलंय असे वाटायचे. 
पण आता मनापासून वाटत होते कि ह्या फसव्या चक्रातून बाहेर पडायला पाहिजे, काहीतरी मनाला समाधान देणारे , व्यावहारिकतेचा गंध नसलेले, स्वतः च्या आवडीचे असे काही करावे; शहरी कोलाहला पासून दूर कुठे तरी पळून जावे. जिथे निदान मोकळा श्वास तरी घेता येईल. 
पण मुलीची शाळा, नोकरी असे तडका फडकी सोडून कसे जमणार ? इतक्या सहज, तेही शहरापासून दूर गावात, पोटापाण्या पुरती का होईना नोकरी कशी मिळणार ?
 मग विचार केला कि हळू हळू स्थलांतर करता येते का पाहू.

क्रमशः