आत्तापर्यंतच्या ह्या प्रवासात, दगदगीच्या डोंगराला सुखद क्षणांची सोनेरी कडा ही होती, सूर्योदयावेळी दिसते तशीच मोहक.
संपूर्ण ओक्याबोक्या माळरानात आधीची मोजून ४ झाडे होती, पण तीही बहुतांशी deciduous trees प्रकारातली (पानगळ होणारी) त्यामुळे मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात उभे राहून काम करवून घेणे भाग होते. प्रत्यक्ष जरी काम करायचे नसले तरी, आपल्या कडील अकुशल कामगारांकडून कामे करून घेणाऱ्या प्रत्येकाला माहित आहे की, अशा कामांत स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. दुपारच्या प्रहरी तर जीवाची काहिली होत असे. मग अशा वेळी त्या मोजक्याच झाडांपैकी एका झाडाखाली बसून, घरून अगदीच फडक्यात बांधून वगैरे नाही तरीही डब्ब्यात भरून आणलेली पोळी -भाजी, वरण-भात खाताना स्वर्ग सुख मिळत असे. कधी मस्त, मास्याचा रस्सा आणि भात किंवा भाकरी, अहाहा !! त्यांनतर कसलाही किंतु परंतु न बाळगता तिथेच पथारी पसरून घेतलेली वाम कुक्षी !
शहरात राहणारे दोन engineers, कधी काळी आपला शनिवार रविवार असा घालवणार आहेत हे जर ह्या पूर्वी कोणी सांगितले असते तर विश्वास बसला नसता. कधी कधी फार साध्या गोष्टी अवर्णनीय असा आनंद देऊन जातात. site वरच साजरा केलेला आई -पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस, पहिला पाऊस, मृदगंध, दगड- मातीच्या ढिगाऱ्यात केलेली मस्ती; weekends ला होणाऱ्या mall मधल्या भटकंती पेक्षा खूप खरी वाटत होती.
क्रमशः




No comments:
Post a Comment