कधी कधी आपल्याला काही गोष्टी सहज घडताना दिसतात किंवा कधी वाटते की काही माणसांचे नशीबच चांगले त्यांना गोष्टी आयत्या आणि सहज मिळून जातात वगैरे वगैरे, पण त्या गोष्टी घडण्या मागे वर्षानो वर्षाची पार्श्वभूमी असू शकते, अर्थात नशिबाचीही साथ असतेच म्हणा (१% त्याचा महत्वाचा असतो, बाकी ९९% तर तुमचेच असतात ) . तर आमच्याहि बाबतीत काहीसे असेच घडले.
जमीन जरी त्याने पप्पांच्या सांगण्यावरून १४ वर्षांपूर्वीच घेऊन ठेवली होती, तरी ती केवळ पुढे मागे विकता येईल ह्या उद्देशानेच. तेंव्हा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल कि आपण तेथे सुंदर eco-tourism विकसित करणार आहोत.
Eco-tourism ह्या कल्पनेचे श्रेय अप्रत्यक्षरित्या आईला जाते. लग्नापूर्वी आम्ही भावंडे आई-बाबांबरोबर हिवाळी सुट्टीत किंवा पावसाळ्यात(ऑगस्ट - सप्टेंबर) नेहमी कोकण वाऱ्या करायचो आणि त्यातून कोकणातील सृष्टी सौंदर्याचे आणि तिथल्या चविष्ट खाद्य संस्कृतीचे आम्ही अट्टल भक्त बनलो होतो. मालवणी जेवण बनविण्यात आईचा हातखंडा असल्यामुळे ती नेहमी म्हणायची की आपलेही एक मालवणी खाद्य संस्कृतीचे हॉटेल असले पाहिजे जे खवय्यांना तृप्त करेल. मला वाटते ती इच्छा सुप्तपणे माझ्याही मनात वास करून राहिली. मालवणी खाद्य संस्कृतीचे हॉटेल काढले पाहिजे असे मलाही नेहमी वाटायचे.
पुढे शिक्षणाने मी इंजिनीर झाले आणि सॉफ्टवेअर मध्ये स्वतःचे बस्तान बसवले तरी मनातून मी ITian न्हवते. ८ वर्षांच्या IT अनुभवानंतर मात्र, घर आणि पूर्ण वेळेची नोकरी ह्यांच्या तारेवरच्या कसरतीला मी कायमचा राम-राम ठोकला आणि आवडीच्या वेगवेगळ्या गोष्टी करून बघितल्या.
त्यातूनच जन्म झाला 'soupsnsalads _____ the health lounge' ह्या फेसबुक वरील माझ्या पेजचा,जे मी घरी केलेल्या 'Healthy recipes' ना dedicated आहे. आमच्याच उपनगरातील एका S.S.C. बोर्डाच्या English medium च्या शाळेतही मी अर्ध-वेळ (part-time) IT teacher (इयत्ता ५-१० वी ) म्हणून ३ वर्षे काम केले.
पुढे माझ्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करता यावा आणि माळरानी नंदनवन फुलविण्या बरोबरच त्याची आर्थिक आघाडी सांभाळता यावी म्हणून खूप विचार-विनिमयातून 'eco-tourism' हा पर्याय आम्ही निवडला. त्याची संकल्पना अशी होती की , इथे आलेल्या पाहुण्यांना खुल्याआसमंती मोकळा श्वास घेता येईल आणि इथले मनोरम सृष्टी सौंदर्य न्याहाळण्या बरोबरच घरच्या कोकणी पद्धतीच्या रुचकर जेवणाचा आस्वाद घेता येईल . ह्यातूनच मग आमच्या 'eco-tourism' मधल्या experiments ना सुरुवात झाली. experiments ह्या साठी म्हटले कि आम्हा दोघांनाही tourism व्यवसायाचा किंबहुना एकूणच व्यवसायाचा शून्य अनुभव होता. पण comfort zone मधून बाहेर पडल्या शिवाय का प्रगती होते?
आता 'eco-tourism' म्हटले की, माळरानाला एक छान नाव पाहिजे; उन्हाळ्यातही नयन सुख देणारे म्हणून 'गुलमोहोरं ' हे नाव द्यायचे ठरले, पण मग ठरेल कि अगदी स्वतःच्या घरी घेतली जाते तशी काळजी घेणारे आणि पाहुण्यांना कोकणातल्या 'आपल्या आजोळची' आठवण करून देणारे असे हे घर म्हणून 'आजोळ' हेच नाव त्याला चपखल बसेल.
आणि सरते शेवटी, ६ जानेवारी २०१३ च्या शुभं मुहूर्ती, सत्यनारायणाच्या साक्षीने आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने आमच्या माळरानाचे 'आजोळ' असे नामकरण झाले.
क्रमशः
No comments:
Post a Comment