Saturday, 14 October 2017

भाग -४ Exploring Options - 'माझ्या मामाचे गाव'.

'पावस''मधील मंत्र मुग्ध करणाऱ्या मुक्कामा नंतर आम्ही आमच्या शोध मोहिमेतील पहिल्या वाहिल्या स्थळी पोहोचलो. ते ठिकाण म्हणजे गुहागर तालुक्यातील, मुंढर येथील 'माझ्या मामाचे गाव'. 




१२. ५ एकरांवर वसलेले हे साळवी कुटुंबियांचे कृषी पर्यंटन केंद्र. साळवी काका, काकू आणि त्यांची २ मुले संकेत आणि समीर मिळून हे  निसर्ग पर्यटन केंद्र चालवितात. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार, संकेत साळवींच्या मामा चे ते गाव होते. खऱ्या अर्थाने मामाचे गाव म्हणून त्यांनी त्यांच्या कृषी पर्यंटन केंद्राचे नावाचं मुळी ठेवलय 'माझ्या मामाचे गाव. 

ती जमीन कित्येक वर्षे पडिकच होती. साळवी काकांच्या VRS मधून आलेल्या पैशांनी त्यांनी ती जमीन विकत घेतली. सुरुवातीची काही वर्षे त्यांचा मोठा मुलगा समीर, मुंबईतून मुंढरला ये जा करून जमिनीची मशागत, वृक्षांची लागवड  ह्या गोष्टी जातीने करून घेत होता. काका काकूही तेंव्हा जाऊन येऊन होते. पुढे समीर मग मुंढरलाच स्थायिक झाला. काका, काकू तो पर्यंत संकेतच्या शिक्षणासाठी मुंबईत, लालबागला राहत होते. संकेतचे शिक्षण पूर्ण झाले आणि मग काय, त्यांचा जीव थोडीच मुंबईत रमणार होता ? त्यांनी लगेच मुंढरला आपला मुक्काम हलविला तो आजतागायत.सेकंड इंनिंग मुळे हाती आलेला मोकळा वेळ आणि निसर्गाची अतोनात आवड,  त्या पडीक जमिनीचे नंदनवन होण्यास फार काळ लागला नाही 

येथील भाजीपाल्याची लागवड, वृक्षांची देखरेख आणि अथितीचें स्वागत काका काकू जातीने करतात आणि  पर्यटन स्थळाच्या प्रसिद्धीचे काम साळवी बंधू सांभाळतात. आम्ही भेट दिली तेंव्हा १२ एकर मधील २. ५ एकर चा परिसर, पर्यंटन केंद्र म्हणून डेव्हलप केलेला होता. जांभ्या दगडातील सुंदर कोकणी पद्धतीची कौलारू cottages आणि  त्या cottages कडे जाणारी तितकीच सुबक नागमोडी जांभ्या दगडाची पायवाट, आजूबाजूला असणारी नारळी-पोफळीची ची झाडे, आम्ही जरी इतका प्रवास करून आलो होतो तरी त्या सौंदर्याने आमचा क्षीण पार नाहीसा झाला .  




आम्ही दोघांनी काका आणि काकूंना भरपूर प्रश्न विचारले आणि त्यांनीही अतिशय आपुलकीने सगळ्याची माहिती पुरवली.  काकांच्या बोलण्यातून शहरातून इथे गावी स्थायिक झाल्यावर मिळणार आनंद आणि मातीशी पुन्हा नाळ जुळून आल्यामुळे मिळणारे मानसिक समाधान डोकावत होते.

सूर्य मावळतीला लागला, तसे काकूंनी दिलेला वाफाळणारा चहा आणि काकांनी दिलेली सोनटक्कयाची आणि गुलाबाची फुले घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. बरोबर अर्थातच खूप सारा उत्साह आणि नवी आशा घेऊनच. 

क्रमशः

1 comment: